वाया जाणार्या ऊस पाचटा पासून सुरु केला उद्योग
-------------------------------------------
शेतीपूरक उद्योग ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्रवीण लंगोटे या तरुण अभियंत्याने उसाच्या पाचटापासून ब्रिकेट (कोळसा) तयार करण्याचा उद्योग सुरू केला आहे. अपारंपरिक इंधन असलेल्या या ब्रिकेटला गोदरेज, पेप्सी, आयटीसीसारख्या प्रसिद्ध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. नोकरीच्या मागे न लागता तरुणांनी ग्रामीण भागात असे शेतीपूरक उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळून त्यांनाही "अच्छे दिन‘ येतील, हे नक्कीच.
पंढरपूर तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. साखर कारखान्यास ऊस पाठविल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणावर उसाचे पाचट शिल्लक राहते. बहुतांश शेतकरी हे उसाचे पाचट शेतातच जाळून टाकतात. वाया जाणाऱ्या या उसाच्या पाचटापासून ब्रिकेट तयार केल्यास मोठ्या प्रमाणावर अपारंपरिक इंधन तयार करता येईल, हे प्रवीण लंगोटे यांनी ओळखले. देगाव रस्त्यालगतच्या जागेत ब्रिकेट तयार करण्याचा लघुउद्योग त्यांनी सुरू केला.
आसपासच्या शेतकऱ्यांकडून उसाचे पाचट एकरी 400 रुपये दराने खरेदी करतात. ट्रॅक्टरला जोडलेल्या स्वयंचलित मशिनद्वारे पाचट गोळा करून आपोआप त्याचे गठ्ठे बांधले जातात. हे गठ्ठे कारखान्यात आणून त्यांचा साठा केला जातो. या उसाच्या पाचटाशिवाय भुईमुगाच्या शेंगाची टरफले, लाकडाचा भुसा, तुराट्या, मक्याच्या कणसाचा बुरकुंडा असे वाया जाणारे पदार्थही श्री. लंगोटे शेतकऱ्यांकडून विकत घेतात.
उसाच्या पाचटामध्ये बगॅस व इतर वाया जाणारे पदार्थ एकत्र करून मशिनच्या साहाय्याने त्याचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर एका कन्व्हेअर मशिनद्वारे तुकडे खेचून पुढील प्रक्रियेसाठी पुढे पाठवले जातात, तर बारीक खडे, माती, कचरा आपोआप बाजूला फेकला जातो. यानंतर हॅमरमिल व ब्रिकेट मशिनच्या साहाय्याने 90 एमएम व्यासाच्या ब्रिकेटची निर्मिती होते. कंपन्या या आपल्या उत्पादन निर्मितीसाठी बॉयलरमध्ये इंधन म्हणून या ब्रिकेटसचा वापर करतात. श्री. लंगोटे यांनी उत्पादित केलेल्या या ब्रिकेटला पुणे गोदरेज, पेप्सी, आयटीसी या मोठ्या कंपन्यांकडून मोठी मागणी आहे.
संपर्क : प्रवीण लंगोटे - ९७३०७६७७७०
आम्ही उसाचे पाचट न जाळता कारखानदाराला विकतो. शेतातील वाया जाणाऱ्या पाचटाचे पैसे तर मिळतातच पण शेतही स्वच्छ होते.
- अण्णा शिंदे, शेतकरी, अनवली (पंढरपूर)
लेखक - राजकुमार घाडगे ९९७०१६९९४९
https://www.facebook.com/raj.ghadge.31
Comments
Post a Comment